मुंबई : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने पाच वर्षांत सलग तिसऱ्या मोठ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. मीराबाई चानूने राष्ट्रकुल स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात वजन उचलून सुवर्णपदक जिंकले आहे.
भारताच्या मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत तिने देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. यावेळी चानू सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने भरलेली दिसली. तिने एकूण 201 किलो वजन उचलले. तिने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलून तिने विक्रम केला आहे.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे तिसरे पदक आहे. 27 वर्षीय मीराबाईचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने गोल्ड कोस्ट 2018 मध्ये गेल्या वेळी सुवर्णपदक आणि 2014 ग्लासगो मध्ये रौप्य पदक जिंकले होते. मीराबाईशिवाय, मॉरिशसच्या मारी रानिवोसोआने दुसरे स्थान पटकावले.
बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर मीराबाई चानू म्हणाली की, गेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी ४८ किलो वजनी गटात जो विक्रम प्रस्थापित केला होता, तोच मी यावेळी बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतही ४९ किलो वजन उचलला आहे याचा मला खूप आनंद आहे. मी माझाच विक्रम मोडला आणि सुवर्णपदक जिंकले, त्यामुळे मला खूप आनंद झाला. टोकियो ऑलिम्पिकनंतर ही माझी सर्वात मोठी स्पर्धा होती आणि यामध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.