
मुंबई : आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तिजोरीवर पडणारा बोजा, आमदारांना खूश करण्यासाठी खर्च होणार निधी, या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून चालू होत आहे. एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली नवीन सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे.
आजपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्ताधिकारी आणि विरोधक यांच्यात जोरदार संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “सत्तेची मस्ती आली आहे का,’’ असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय. पावसाळी अधिवेशन सहा दिवस होणार आहे. या सहा दिवसाच्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या, प्रभाग रचनेत बदल, नगराध्यक्ष, सरपंचांची थेट निवडणूक, विद्यापीठ कायद्यात सुधारणा अशी सर्व विधेयके मांडण्यात येणार आहेत.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी एकनाथ शिंदे मदत करणार अशी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला असला तरी ही मदत अपुरी असल्याचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय जाहीर करण्यात येईल. अशी माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे लवकरात लवकर जमा होतील असे एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.