
पुणे : एमपीएससी(MPSC) मार्फत घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० चा अंतिम निकाल तसेच शिफारस यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक रोहित कट्टे यांनी मिळवलेला आहे. मागासवर्ग प्रवर्गातून पवन नाईक यांनी तर महिला प्रवर्गातून कीर्ती कुंजीर यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे.
निकाल प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेला आहे. या मुलाखती ९ ते १३ मे आणि २३ ते २७ मे यावेळी घेण्यात आल्या होत्या. यावेळी पाच संवर्गातील 217 पदांपैकी 215 उमेदवारांची शिफारस केलेली आहे. यानंतर प्रत्येक प्रवर्गासाठीचे पात्रता गुण आणि निकाल देखील जाहीर करण्यात आलेले आहेत.
जर शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना आपल्या गुणांची पडताळणी करायची असेल तर या उमेदवारांनी निकाल त्यांच्या ऑनलाइन खात्यात पाठवल्यावर दहा दिवसांच्या आतमध्ये आयोगाकडे ऑनलाइन अर्ज करावा.
शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांनी अर्जात दिलेली सर्व माहितीची सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत तपासणी करूनच त्यांना संबंधित पदावर नियुक्त करण्यात येणार आहे. अर्जात दिलेली माहिती खोटी ठरली किंवा आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्या वेळी केली नाही तर या कारणांमुळे उमेदवार अपात्र ठरतील. अश्या उमेदवारांची उमेदवारी केव्हाही रद्द केली जाऊ शकते.
हा निकाल न्यायालयात किंवा न्यायाधीकरणात दाखल असलेल्या विविध न्यायिक प्रकरणांतील अंतिम न्यायनिर्णयाच्या, आरक्षणासंदर्भात असलेल्या प्रकरणपरत्वे तसेच शासनाकडून होणाऱ्या कार्यवाहीच्या अधीन राहूनच जाहीर करण्यात आला आहे हे स्पष्ट केलेले आहे.