BJP । लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी राज्यात नाट्यमय घडामोडी घटना पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांना पक्षाने तिकीट न दिल्याने ते दुसऱ्या पक्षात जाणे पसंत करत आहेत. अशातच आता भाजपने काँग्रेसला (BJP vs Congress) पुन्हा एकदा सर्वात मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचा (Congress) बडा नेता भाजपच्या गळाला लागला असून तो लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. (Latest marathi news)
काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव असणारे नितीन कोडवते (Nitin Kodavate) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत नितीन कोडवते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडवते इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारी दिली नाही.
त्यामुळे ते पक्षाच्या निर्णयावर नाराज होते. नाराज असलेले नितीन कोडवते हे आता भाजपमध्ये जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नितीन कोडवते हे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय होते. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघामध्ये माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते या तिघांमध्ये स्पर्धा होती.