नाशिक हे खवय्यांचे शहर आहे. मध्यंतरी हिंद केसरी थाळी मुळे नाशिक चर्चेत आले होते. आता देखील दीड लाख रुपयांच्या पानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनेक लोक आवडीने पान खातात. एखाद्या दुकानात जाऊन लोक बदल म्हणून मसाला पान वैगरे खातात. आता तर पानाचे विविध प्रकार देखील आहेत. परंतु, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण नाशिक ( Nashik) मध्ये एका पानाच्या दुकानात 600 पेक्षा जास्त पानाचे प्रकार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे यातील एक पान तर चक्क दीड लाख रुपयांचे आहे.
फक्त नाशिककरच नाही तर अनेक दर्दी पर्यटक याठिकाणी पान खाण्यासाठी येतात. येथील गणेश डुकरे या तरुणाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फॅमिली पान हाऊस ( Family Pan House) सुरु केले आहे. मात्र ‘आलं मनात आणि केलं क्षणात’ असे न करता गणेशने पूर्ण अभ्यास करत हे पान स्टॉल टाकले आहे. त्याने स्वतः पानांचा अभ्यास करून वेगवेगळे फ्लेवर तयार केले आहेत.
फॅमिली पान हाऊस मध्ये 600 पेक्षा अधिक फ्लेवर चे पान उपलब्ध आहेत. यामध्ये चंदन मसाला पान, नवाबी पान, चीज चॉकलेट पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान यांसारखे प्रकार मिळतात. याची किंमत 30 रुपयांपासून दीड लाखापर्यंत आहे. पेशवाई गोल्ड पान ही येथील स्पेशालिटी असून त्याची किंमत दीड लाख रुपये आहे. शरीरासाठी गुणकारी अशा 18 आयुर्वेदिक ( Aayurvedik) वस्तूंपासून हे पान बनविण्यात आले आहे.