काही स्त्रिया मानव जातीला आदर्शाचा वस्तूपाठ देण्यासाठीच जन्माला येतात. भारतीय स्त्रिया ह्या नेहमीच प्रेरणास्रोत आणि सामाजिक बदलासाठी उत्प्रेरक ठरल्या आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे सुधा मूर्ती! ज्यांनी भारतीय समाजावर आपल्या व्यक्तित्वाचा ठळक प्रभाव पाडला आहे. एक लेखिका, उद्योजक आणि परोपकारी स्त्री! भारतातील पहिली महिला अभियंता बनण्यापासून ते Infosys सारख्या कंपनीचे प्रमुख बनण्यापर्यंत च्या प्रवासात त्यांची समाजात बदल घडवण्याची प्रचंड इच्छाशक्ती कारणीभूत ठरली आहे. मूर्ती त्यांच्या सामाजिक कार्यासाठी तसेच कन्नड आणि इंग्रजी साहित्यातील योगदानासाठी प्रसिद्ध आहेत. याशिवाय त्यांनी इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून शिक्षण, सार्वजनिक स्वच्छता, दारिद्र्य निर्मूलन इत्यादींबद्दल जागरूकता पसरवण्याचे महत्कार्य केले आहे. त्यामुळेच पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केलेल्या सुधा मूर्ती यांच्या परोपकारी कार्याला जागतिक मान्यता मिळाली आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन त्यांनी 1996 मध्ये इन्फोसिस फाऊंडेशन सुरू केले. एकदा त्यांनी टाटा मोटर्स अर्थात टेल्को म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या कंपनीच्या केवळ पुरुषांसाठीच्या धोरणाबद्दल लिहिले होते. त्याचा परिणाम म्हणून त्यांना मुलाखतीकरिता बोलावण्यात आले. अशापद्धतीने त्या भारतात नोकरी करणाऱ्या पहिल्या महिला अभियंता बनल्या.
सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात केली. त्या सध्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाऊंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून पुढे त्यांनी पूरग्रस्त भागात 2300 घरे बांधली आहेत. त्यांनी शाळांमध्ये 7000 लायब्ररी आणि 16,000 शौचालये बांधली आहेत. सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यसेवा, शिक्षण, कला, संस्कृती आणि गरिबी निर्मूलनात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ची देखील स्थापना केली आहे. तसेच अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली असून ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये देखील भाग घेतला आहे. कर्नाटकातल्या सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला आणि कर्नाटकातील सर्व शाळांमध्ये संगणक आणि लायब्ररी सुविधा सुरू करण्यासाठी एक धाडसी पाऊल उचलून संगणक विज्ञान शिकवले. 1995 मध्ये बेंगळुरू येथील रोटरी क्लबकडून त्यांना “सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार” देखील मिळाला.
भारताच्या शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याचे त्यांचे प्रयत्न देशात अभूतपूर्व ठरले आहेत. सुधा मूर्ती या नेहमीच महिलांच्या हक्कांच्या पुरस्कर्त्या आणि शिक्षणाच्या विकासात अग्रणी राहिल्या आहेत. पती नारायण मूर्ती यांना इन्फोसिसची स्थापना करण्यात आणि त्यांना सुरुवातीची गुंतवणूक करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्याबरोबरच, त्यांनी विपुल साहित्य लेखनही आहे. ज्यात मुलांसाठीच्या पुस्तकांचाही समावेश आहे. आपल्या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी तरुण आणि वृद्धांना वाचनाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या या विलक्षण कार्यामुळे त्यांना जीवनगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 2019 मध्ये, त्यांना पद्मश्री या भारतातील विशेष नागरी पुरस्काराने देखिल सन्मानित करण्यात आले आहे.
खरेपणा, पारदर्शक आणि स्पष्ट विचार, कुठेही भडकपणा नाही, विलक्षण सुसंस्कृतपणा आणि सुसूत्रता या अश्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या सुधा मूर्ती यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!