Parbhani News । महावितरणाच्या चुकीमुळे अनेकदा निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सध्या देखील परभणी जिल्ह्यातून असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये एका चिमुकलीला महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे जीव गमवावा लागला आहे. घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, जिंतूर शहरातील मिश्किन प्लॉट परिसरात तीन वर्षीय चिमुकली खेळत असताना. तिचा स्पर्श त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबाला झाला. त्या खांबात वीजप्रवाह उतरला होता. त्यामुळे तीन वर्षीय चिमुकलीला जोरदार विजेचा धक्का लागला आणि यामध्येच तिचा मृत्यू झाला आहे.
विजेचा धक्का लागल्याने चिमुकली तडफडत खाली कोसळली. कोसळल्यानंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी तिला तातडीने जिंतूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासादरम्यान चिमुकलीला मृत घोषित केलं. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.