PM Modi Speech । अयोध्येतील भव्य राम मंदिराचे आज मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले आहे. यासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. राजकीय नेतेच नव्हे तर सेलिब्रेटींनी देखील या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थिती लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी हा लोकार्पण सोहळा पार पडला.
या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आले म्हणत देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी भावुक देखील झाले. 22 जानेवारी हा दिवस हा कायम आपल्या स्मरणात राहील कारण आज आपले राम आले आहेत. आपले राम आता झोपडीत राहणार नसून ते भव्य मंदिरामध्ये राहणार आहेत. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
त्याचबरोबर पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, “मी आज प्रभू रामाची माफी मागतो आमच्याकडून तपस्येत काहीतरी कमतरता राहिली असावी. कारण आपण इतक्या वर्षात हे काम करु शकलो नाही, आज ते पुर्ण झाले. मला विश्वास आहे की प्रभू श्री राम आपल्याला नक्की क्षमा करतील,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, आज प्रभू श्रीरामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त अयोध्याच नाही तर संपूर्ण देशभरात मोठा जल्लोष साजरा करण्यात येत आहे.