Praful Patel । अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बुधवारी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Elections) उमेदवारी दिली. पक्षाचे महाराष्ट्र विभाग प्रमुख सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पटेल यांच्या नावाची घोषणा केली. गेल्या वर्षी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) फूट पडल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री पटेल यांनी अजित पवारांच्या गोटात प्रवेश केला होता.
पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे उमेदवार असतील, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. विशेष म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचा राज्यसभेचा कार्यकाळ बाकी असताना पक्षाच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ( उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी का देण्यात आली याबद्दल संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘प्रफुल्ल पटेल यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि ते अपात्र ठरू नये यासाठी अजित पवार यांच्या गटातून त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली ‘ असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्याचबरोबर संजय राऊत यांनी एक टोला देखील लागावला आहे. भाजपकडून निष्ठावांतांना सतरंज्या उचलायला लावायच्या आणि बाहेरच्यांना उमेदवारी द्यायच्या यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. असा टोला संजय राऊत यांनी लगावला.