Pune News । सध्या एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील ऐतिहासिक वारसा असणारा भिडे वाडा अखेर जमीनदोस्त झाला आहे. पुणे महापालिकेने बुलडोजरच्या साह्याने मोडकळीस आलेल्या या भिडेवाड्याची इमारत जमीन दोस्त केल्याची माहिती मिळत आहे. आता या ठिकाणी ऐतिहासिक स्मारक होण्याचा मार्ग देखील मोकळा झाला आहे.
भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. हा भिडे वाडा पुण्यातील दगडूशेठ गणपती समोर आहे. ही देशातील मुलींसाठी असणारी पहिली शाळा ठरली होती. त्यामुळे या वास्तूला देशाच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. त्यामुळे या जागेवर स्मारक व्हावं ही अनेक वर्षांची मागणी होती. मात्र भाडेकरूंच्या वादामध्ये हा विषय अनेक वर्ष प्रलंबित राहिला होता. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर या वाड्याच्या जागेवर स्मारक उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
न्यायालयांच्या आदेशानंतर भाडेकरूंना नोटीसा बजावण्यात आल्या. यानंतर भाडेकरूंनी जागा सोडल्या आणि नंतर सोमवारी रात्री उशिरा भिडे वाड्यावर बुलडोजर चालवण्यात आला. ही जागा मोकळी झाल्यानंतर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा यथोचित स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.