बारामती : परिस्थितीच्या छाताडावर पाय देऊन यशाची वाट निर्माण करणारी अनेक असामान्य माणसे आपल्या आजूबाजूला असतात. भारताच्या बेसबॉल संघाची नवनिर्वाचित कर्णधार रेश्मा पुणेकर ( Reshma Punekar) ही यातीलच एक आहे. (Indian Baseball team captain) बारामती तालुक्यातील पवारवाडी या छोट्याशा गावात राहणारी अगदी सामान्य घरातील रेश्मा आता देशासाठी खेळणार आहे. तिचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. मात्र या सगळ्या संघर्षाला धीराने आणि जिद्दीने तोंड देत तिने हे यश मिळवले आहे.
‘या’ दिवशी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल येऊ शकतो; वाचा सविस्तर
लहानपणापासून मेंढ्यांच्या पाठीमागे काठी घेऊन पळणाऱ्या रेश्माने हातात स्लगर घेऊन आजपर्यंत अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. रेश्माने आजपर्यंत दोन आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून २३ राष्ट्रीय सामन्यात महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व केले आहे. तिला आजपर्यंत ४ सुवर्ण, ६ सिल्व्हर आणि ३ कास्य पदक मिळाले आहेत. तसेच रेश्माने आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार आपल्या नावावर केला आहे.
रेश्मा पुणेकर अगामी आंतरराष्ट्रीय आशिया कप स्पर्धा २०२३ ( International Asia Cup Competition 2023) मध्ये भारतीय महिला बेसबॉल संघाची कर्णधार म्हणून नेतृत्व करणार आहे. दरम्यान रेश्माच्या घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आतापर्यंत मिळालेले सन्मान, मेडल्स व प्रमाणपत्र ठेवण्यासाठी साधं कपाटसुद्धा रेश्माच्या घरी नाही. तिच्याकडे खेळण्याची प्रचंड क्षमता आहे. मात्र अगामी काळात खेळण्यासाठी लागणारा आहाराचा खर्च, साहित्याचा खर्च तिला परवडणारा नाही. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी रेश्माने सर्वांना आवाहन केले आहे.