
Rohit Pawar । राज्यात यंदा बारामती मतदारसंघाची (Baramati Constituency) चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. कारण गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले. त्यामुळे बारामती मतदारसंघात यंदा सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule Vs Sunetra Pawar) असा संघर्ष होणार आहे. दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)
“शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वात काम करत असताना अजित पवार संपूर्ण राज्यभर फिरायचे. पण सध्या ते बारामतीमध्ये अडकून पडले आहे. कारण भाजपने त्यांना लोकल नेता बनवलं आहे. त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची (BJP) चाल आहे. आज आमचा 70 वर्षाचा युवा नेता राज्यभर 40 ते 50 सभा घेणार आहेत. पण अजित पवार फक्त बारामतीत फिरत आहे”, अशी बोचरी टीका रोहित पवारांनी केली आहे.
पुढे रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्रात अजित पवारांनी बोलू नये, अशी भाजपची इच्छा आहे. राज्यात सध्या अजित पवारांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. त्यातच त्यांचा उमेदवार तीन लाखांनी मागे असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे,” असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे. रोहित पवारांच्या आरोपावर अजित पवार काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.