मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे व ठाकरे गटाकडून सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या ४ याचिकांवर आज निकाल दिला आहे. यामध्ये सत्तासंघर्षाच्या काळातील राज्यपालांची भूमिका चुकीची असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) मांडले तसेच उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी राजीनामा दिल्याने त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद देता येणार नाही. असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “नुकतेच माझे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे. त्यात हा विषय आहे. त्यात मी काही गोष्टी स्पष्ट लिहिल्या आहेत. मात्र, मी स्पष्ट लिहिल्यामुळे आमच्या मित्रपक्षात नाराजी झाली. परंतु, माझा कोणालाही नाराज करण्याचा हेतू नव्हता. ती वस्तुस्थिती होती. सुप्रीम कोर्टाने ती स्पष्ट केली आहे. ठिक आहे जे झालं ते झालं. आम्ही, उद्धव ठाकरे व काँग्रेस मिळून जोमाने काम करायला सुरुवात करु”, असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
मोठी बातमी | सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी ; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
दरम्यान १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यावर देखील शरद पवार यांनी मत व्यक्त केले आहे.” मूळ राष्ट्रीय पक्षाच्या सूचनेने लोक निवडणूक लढवत असतात आणि निवडून येतात. यामध्ये त्या पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हे कोर्टाने सांगितलेलं आहे. मला वाटतं, सत्तासंघर्षाबाबत काही निर्णय अद्याप व्हायचे आहेत. उदाहरण घ्यायचे झालेच तर विधानसभा अध्यक्षांकडे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुपूर्द केलेला आहे. याबद्दल अध्यक्षांनी योग्य वेळेत निर्णय घ्यावा, अशी सुप्रीम कोर्टाची अपेक्षा आहे. ज्यावेळेला विधानसभा अध्यक्ष याबाबत निर्णय घेतील तेव्हा कोर्टाचा निकाल जो कालावधी संदर्भात आहे, ते आमचं म्हणणं मांडून निर्णय घेतील त्याला किती वेळ जाईल ते बघावं लागेल ” असे शरद पवार म्हणाले आहेत.