मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) 50 आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेसोबत बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. अनेक खासदार देखील शिंदे गटासोबत गेले. शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली पण या बंडखोरीनंतर आता शिवसेनेला पहिलं यश मिळालेले आहे.
उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेना गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच आता चिंचपूर ग्रामपंचायतीमधील सर्व सातच्या सात जागा ठाकरे गटाने जिंकलेल्या आहेत. यामुळे शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. माजी सहकारमंत्री आणि भाजपा आमदार सुभाष देशमुख (Shubhas Deshmukh) यांना मोठ्या प्रमाणात या निकालाचा झटका बसला आहे कारण सोलापुरात त्यांचेच वर्चस्व होते.
सकाळी 9.30 पासून सोलापूर जिल्ह्यामधील २५ ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. सर्वात पहिल्यांदा चिंचपूर ग्रामपंचायतीचा निकाल समोर आला असून यामध्ये ठाकरे गटाचा विजय झाला आहे. जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील (Amar Patil) आणि माजी आमदार रविकांत पाटील (Ravikant Patil) यांच्या गटाकडे सत्ता गेली असून भाजपाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाला मोठा धक्का बसलेला आहे.
दरम्यान, राज्यातील एकूण १५ जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार असून या निकालाकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.