दौंड: राज्यातील बहुतेक कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू झाला आहे. यामुळे ऊसतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी खोडवा (Khodwa Management) ठेवण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान उसातील (Sugarcan) पाचटाचे व्यवस्थापन हा शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. यासाठी दौंड तालुक्यातील खडकी येथे कृषि विभागाच्या वतीने ऊस पाचट व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
खडकी येथे कृषि अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पाचट व्यवस्थापन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पाचट जाळल्यामुळे जमिनीतील जैविक घटकांचा व अन्नद्रव्यांचा नाश होतो व पर्यावरणाचा समतोल बिघडतो. याशिवाय उसाच्या पाचटामध्ये 0.50 टक्के नत्र, 0.20 टक्के स्फुरद, 1 टक्के पालाश आणि 40 टक्के सेंद्रिय कर्ब असतो अशी माहिती दिली. याशिवाय पाचट पसरवण्याची व खते देण्याची पद्धत, बुडके छाटणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी अंगद शिंदे (कृषी सहाय्यक, रावणगाव, दौंड) यांनी पाचट व्यवस्थापनाबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले आहे. त्याचबरोबर अतुल होले (कृषी सहाय्यक, खडकी, दौंड), शंकर कांबळे ( कृषी सहाय्यक, स्वामी चिंचोली, दौंड) अजहर सय्यद ( कृषी सहाय्यक, मळद, दौंड) यांनी देखील मार्गदर्शन केले