मुंबई : बॉलिवूडची बेबी डॉल म्हणून सनी लिओनीला (Sunny Leone) ओळखले जाते. सनी सध्या फिल्मी जगतापासून दूर असल्याचं दिसून येत आहे. तरी देखील सनी सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच सनीने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
सनी लिओनीने फिल्ममेकर अनुराग कश्यपसोबतचा (Anurag Kashyap) एक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून शेअर केला आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “होय स्वप्न खरी होतात. हेच माझ्या आनंदी चेहऱ्या मागचं कारणं आहे. अनुराग कश्यपसारखा कुणी मला संधी देण्याचा चान्स घेईल असा विचार मी लाखो वर्षात करू शकत नाही.”
पुढे तिने लिहिले की, “माझा प्रवास उत्कृष्ट असला तरी तो सोपा अजिबातच नव्हता. इतकी वर्ष भारतात आणि बॉलिवूडमध्ये राहिल्यानंतर मला एक फोन आला आणि विचारण्यात आलं की मी अनुराग कश्यपच्या सिनेमासाठी ऑडिशन देण्यास इच्छुक आहे का? आयुष्यात असे काही क्षण येतात जेव्हा सारं काही बदलतं. असाच हा क्षण कायम माझ्या स्मरणात राहिल. पुढे काय होईल याचा फरक पडत नाही. पण अनुराग सर तुम्ही मला संधी दिलीत हे मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. तुमच्या दमदार सिनेमाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.”
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अनुराग सनीच्या मांडीवर बसलेला दिसत आहे. या फोटोवर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.