मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (suprime court) सुनावणी झाली. पण आज या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताच निर्णय दिलेला नाही. 8 ऑगस्टला या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे. या प्रकरणावर मोठं खंडपीठ निर्माण करायचे की नाही यावर सोमवारी निर्णय होणार आहे.
5 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( cm eknath shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार होता. पण आता या प्रकरणातील सुनावणी 8 ऑगस्टवर गेल्याने मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार की नाही तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra fadanvis ) याबाबत काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोर्टाने निवडणूक आयोगाला देखील पक्ष आणि चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. याचसोबत मंत्रिमंडळ विस्ताराला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी परवानगी देणार की नाही हे जाणून घेण्याची देखील सर्वांना उत्सूकता लागलेली आहे.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी सांगितले आहे की, मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा की नाही हा प्रश्न राज्यसरकारचा आहे. तसेच राज्यपालांची आतापर्यंतची भूमिका पाहिली तर ते मंत्रिमंडळ विस्ताराला मंजुरी देतील असं वाटतं. पण अस असलं तरी सर्वोच्च न्यायालय सर्व निर्णय रद्द करू शकतात.
दरम्यान, ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ अनंत कळसे यांनी सांगितले आहे की, कोर्टाने मंत्रिमंडळ विस्ताराला स्थगिती दिलेली नाही. यामुळे राज्यसरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करू शकते पण 8 ऑगस्ट पर्यंत शिंदे सरकार थांबेल अस वाटत. याचसोबत हे प्रकरण घटनापीठाकडे जावं असे देखील ते म्हणाले आहेत.