Supriya Sule On Ajit Pawar । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या आणि चार वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण राजकीय लढाईला सामोरे जात आहेत. त्यांचे चुलत भाऊ अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतल्याने शरद पवार यांच्या मुलीचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.
सुप्रिया सुळे या निवडणुकीत विजयी झाल्या तर त्या शरद पवारांच्या राजकीय वारशाच्या खऱ्या वारसदार ठरतील. पण त्यांचा पराभव झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडेल. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या बारामती येथील घरी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, अजित पवार यांच्या छावणीतून त्यांच्या सामर्थ्याबद्दल आणि त्यांच्यावर होत असलेल्या वैयक्तिक हल्ल्यांबद्दल वक्तव्य केले आहे.
आपण कोणालाही काम करायला भाग पाडले नाही या अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळे म्हणाल्या की, मग आपलेच कार्यकर्ते असे का बोलतात? त्यांचे सगळे कारखाने आहेत, मशिनरी आहे. तुम्ही कदाचित माझ्या मतदारसंघाबाबतच बोलत असाल. मला माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे. माझी कामगिरी, माझे संपर्क आणि विकास ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. या चार सर्वात मोठ्या गोष्टी माझ्या बाजूने काम करत आहेत. असं त्या म्हणाल्या आहेत.