मुंबई : शिंदे आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झाले आहे. यामधील महत्वाची खाती देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) आली आहेत. तसेच कमी महत्वाची खाती मिळाल्यामुळे अनेक मंत्री नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. आता याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टप्पणी केली आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “घरातील बायको एवढी रुसत नसेल तेवढे हे मंत्री रुसत आहेत”
“अडीच वर्षामध्ये आमची सत्ता गेली.पण पुढच्या अडीच वर्षानंतर निवडणुका लागतील. मात्र सध्या शिंदे आणि भाजपा यांच्या संयुक्त सरकारमधील मंत्र्यांमध्ये रुसवे-फुगवे आहेत. घरात बायको जेवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगत आहेत,” अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
काही महत्वाची खाती न मिळाल्यामुळे काही मंत्री नाराज आहेत असं म्हंटल जात आहे. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, रोजगार हमी योजना विभागाचे मंत्री संदीपान भुमरे तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. नाराजीच्या या चर्चेनंतर या मंत्र्यांनी आम्ही नाराज नाही असे स्पष्टीकरण देखील दिले आहे.
मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार पार पडला आहे. विस्तारामध्ये कोणत्याही प्रकारचे स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले. शिरसाट यांना पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.