
पुणे : सध्याच्या काळात शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभे आहे. मका पिकात लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक पातळीवर नुकसान होत आहे. यंदाही नुकतीच मका पिकाची पेरणी झाली असून सध्या हे पिक अवघ्या गुडघाभर वाढले आहे तर काही ठिकाणी वीतभर वाढलेले आहे, अशाही अवस्थेत मकावर लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाल्याचे चित्र असून आतापासूनच योग्य त्या मात्रेनुसार फवारणी करण्याचे आवाहन तज्ञांनी केले आहे.
मका पिकाची लागवड केल्यानंतर १० ते १५ दिवसांनी निरीक्षण करावे. त्यामध्ये साधारण किडीची अळी अवस्था पिकांना नुकसान पोहोचते. सुरुवातीच्या अवस्थेत अळ्या पानाचा हिरवा भाग खरवडून खातात. त्यामुळे पानावर पांढरे चट्टे दिसतात. मोठ्या आळी या पाने कुरतडुन खातात. त्यामुळे पानांची छिद्रे दिसतात. पानांची छिद्रे व पोंग्यमध्ये अळीची विष्ठा ही चिन्हे या अळीच्या प्रादुर्भावाची लक्षणे आहेत. या किडींच्या प्रादुर्भावामुळे ३० ते ६० टक्के पर्यंत उत्पन्नात घट होऊ शकते. तुरा आणि कणीस भरण्याच्या अवस्थेत अळी कणसात प्रवेश करून दाण्यांवर उपजीविका करते त्यामुळे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते.
चला तर मग जाणून घेऊया या आळीवर नियंत्रण कसे करायचे?
- आळीचा प्रादुर्भाव दिसू लागताच जैविक कीटकनाशक नोमुरिया रिलाई ३ ग्रॅम किंवा मेटॅऱ्हायझियम ॲनीसोप्ली ५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
- जमिनीवर गुळाचे पाणी फवारल्यास मुंगळे आकर्षित होऊन अळ्यांचे नियंत्रण करतात तर पोंग्यात माती, वाळू व चुना ह्यासारखे पदार्थ ९:१ या प्रमाणात टाकल्यास अळ्या रोगग्रस्त होऊन देखील मरतात.
- आळीचा झाडावर जर पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त असेल तर निंबोळी अर्क किंवा अझाडिरेक्टिन 1500 पी पी एम, किंवा स्पाईनोटोरम 11 टक्के एस सी या कीटकनाशकाची फवारणी करावी . आणि मक्याचे झाड जर 10 ते 20% प्रादुर्भावग्रस्त असेल तर थायमेथॉक्झाम 12.6 टक्के व त्याचबरोबर लैमडा सायक्लोथ्रीन 9.5 टक्के झेड सी या कीटकनाशकाची फवारणी करावी.