Site icon e लोकहित | Marathi News

Kiran Mane : तुमचे लै लै लै आभार…”, किरण मानेंची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत

Thank you Lai Lai Lai...", Kiran Mane's 'She' Facebook post in discussion

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे कायम काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. मागच्या काही महिन्यांपूर्वी किरण माने यांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून मालिकेमधून टाकण्यात आले होते. राजकीय भूमिका घेत असल्याचे कारण देत ही कारवाई देखील करण्यात आली, असा आरोप किरण माने यांनी केला होता. यानंतर आता किरण माने यांनी त्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

किरण मानेंनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘झी मराठी’, तुमचे लै लै लै आभार… सहा महिन्यांपूर्वी माझ्या ‘अत्यंत वादग्रस्त ठरवल्या गेलेल्या’ विषयाला, तुमच्या प्राईम टाईममध्ये स्थान देऊन, त्यावर योग्य ते मत विचारायचं आनि मांडायचं ‘स्वातंत्र्य’ सुबोध भावे-अनिता दातेला दिल्याबद्दल !

खरंतर मी कधीच कुनाच्या पाठिंब्याची अपेक्षा ठेवली नव्हती. सत्यासाठी एकटा लढायची हिम्मत हाय माझ्यात. खरा मानूस कुनाच्या बापाला भेत नाय. पन त्यावेळी मूग गिळून गप्प बसलेल्या कणाहीन मराठी कलाकारांची दया मात्र आलीवती. “नक्की सेटवर काय घडलंय हे आम्हाला माहीती नाही.” या बुरख्याआड बिचारे जीव दडून बसले.

मुळात मुद्दा ‘किरण मानेची चूक होती की नव्हती?’ हा नव्हताच… मुद्दा एवढाच होता की “चूक असो-नसो, कलाकाराला काढून टाकण्याआधी त्याला लेखी नोटीस का दिली नाही? त्याच्यावरच्या आरोपांचे पुरावे व्यवस्थित तपासले गेले होते का? असल्यास त्या केलेल्या तपासाचे आणि किरण मानेंना दिलेल्या वाॅर्निंगचे लेखी पुरावे आहेत का? असतील तर त्याला तुम्ही चोरासारखं गुपचूप का काढून टाकलं?? आणि नंतर पाच दिवस यासंबंधी कुठलीच लेखी जबाबदारी घेणं का टाळलं???” इतकं साधं-सरळ-सोपं होतं सगळं भावांनो.

मला काढनार्‍यांकडं या प्रश्नांची उत्तरं आजबी न्हाईत. म्हनूनच आजबी हे ‘विवेकी’ मुद्दे मांडून त्यावर ठाम असनारी अनिता दाते महत्त्वाची हाय. ते एडीट न करता प्रसारीत करनार्‍या ‘झी मराठी’नं मला एका प्रकारे पोएटिक जस्टिस दिला. अनिता गेली पंध्रा वर्ष मला ओळखतीय. ‘वाडा चिरेबंदी’,’गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’ या नाटकांत आम्ही एकत्र होतो. ‘माझ्या नवर्‍याची बायको’मध्ये आम्हाला भाऊबहीन म्हनून महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यामुळं माझ्याबाबतीतलं तिचं मत हलक्यात घेन्यासारखं नाय.

अनितासोबतच माझ्या पाठीशी ठामपणे, निडरपने उभ्या राहिल्या त्या प्राजक्ता केळकर, श्वेता आंबीकर, शितल गिते आणि गौरी सोनार या माझ्या सहकलाकार. “किरण माने आम्हाला फादर फिगर होते. त्यांच्याविषयी वडिलांइतकाच आदर आहे आमच्या मनात. कायम पाठीशी उभे असायचे. एखादा सिन करताना तो चांगला व्हावा म्हणून सतत आम्हाला मार्गदर्शन करायचे. सेटवर त्यांनी कणभरही गैरवर्तन केलेलं आम्ही पाहिलं नाही.” असं नॅशनल टीव्हीवर सांगीतलं त्यांनी. कुठल्याबी दबावाला न जुमानता ! कलावंताचा कणा असा असतो राजा !!

आता हे सगळं बघून ‘सत्य’ ओळखनं अवघड नव्हतं. सर्वसामान्य प्रेक्षकांनी ते जानलं आनि स्वत:ची ताकद दाखवली. त्यांनी सिरीयल बघनंच सोडून दिलं. तीन म्हैन्यात टीआरपी घसरन्याची नामुष्की येऊन, सिरीयलला प्राईम टाईमचा स्लाॅट गमवावा लागला. त्यानंतर तीन म्हैन्यात आनखी एक सातारी हिस्का बसला. सातार्‍याजवळ आमच्याच आधारानं जिथं ‘कधी स्वस्तात-कधी फुकटात’ शुटिंग चाललंवतं तिथनं लाथ बसली. हकालपट्टी झाली. सगळं चंबूगबाळं आवरुन जावं लागलं मुंबैला. मला संपवायला निघालेल्यांचा सहा म्हैन्यात सुफडासाफ झाला. पन मी उभाच हाय. भक्कम. पाय रोवून. अभिमानानं. हसतमुख. कारन मी ‘खरा’ हाय. पाच महिला कलावंतांनी, सर्वसामान्य प्रेक्षकांनी आनि ग्रामस्थांनी दाखवलेली ही धमक कलाकारांना का दाखवता आली नाय?? इतकी लाचारी का???

मराठी कलाकार भावांनो आनि बहिनींनो. निदान आज स्वातंत्र्यदिनादिवशी तरी आत्मपरीक्षन करा. गुलामी झुगारून लावा. एक व्हा. सत्याचा आग्रह धरा. खोटं कितीबी बलवान असूद्या, त्याच्यापुढं ताठ मानेनं उभं र्‍हावा. तुम्ही आज सुपात आहात. उद्या तुमी जात्यात जाऊन भरडू नये म्हनून मी लढतोय, हे लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिबा फुले म्हनून गेलेत, “सत्याच्या वाटेवर चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका.” सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !

किरण मानेंची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.

Spread the love
Exit mobile version