मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं कोणतंही अधिवेशन असलं तरी आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी होतच असते. एका चर्चेवेळी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टोलेबाजी केली यामुळे संपूर्ण सभागृहातील लोकांना हसू आवरत नव्हते. आपल्या भाषणातून छगन भुजबळ यांनी चक्क मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde) दाढीलाच हात घातला आहे.
विधानसभेतील कामकाजाच्या दरम्यान आज जीएसटीसंदर्भातील विधेयक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणालेले आहेत की, “आपण सगळ्यांनी सांगितलं की जीएसटीचं संकलन वाढलं आहे. आत्तापर्यंत अन्नधान्यासहित अनेक जीवनावश्यक वस्तू करमुक्त होत्या. पण नव्या निर्णयामुळे पॅकिंग अन्नदान्य, पीठ, रवा, मैदा, दुग्धजन्य पदार्थ अशा अनेक जीवनावश्यक गोष्टींवर ५ टक्के जीएसटी लागू होत आहे. याचा फटका सर्वसामान्य जनतेलाच बसणार आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जेव्हा एखादा कर वाढवता, तेव्हा त्याचा फटका शेवटच्या माणसाला बसतो”.
याचवेळी छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावरून सभागृहातील लोकांना हसू आवरत नव्हते. ते म्हणाले आहेत की,”समोर मुख्यमंत्री बसले आहेत. मला मुख्यमंत्र्यांकडे बघून खूप आनंद झाला आहे. पण तुम्ही मुख्यमंत्री झालात यासोबतच मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव फक्त महाराष्ट्रात आहे. सफेद दाढीचा प्रभाव दिल्लीपासून भारतभर आहे”.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना छगन भुजबळ म्हणालेले आहेत की, “तुम्ही तिकडे जे मंजूर झालंय, ते इथे मंजूर करून घेत आहात. पण महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची महागाईबाबतची ही भावना तिकडे त्यांना तुम्ही सांगा. सगळ्या ठिकाणी भाववाढ सुरू आहे. शाळेतल्या पेन्सिल, खोडरबरवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयाच्या ५ हजारांवरच्या बिलावर जीएसटी लावला आहे. आपल्या उपमुख्यमंत्र्यांचा दरारा तर दिल्लीमध्ये खूपच वाढला आहे. मोठ्या कमिटीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी जीएसटीसंदर्भातलं महाराष्ट्राचं हे म्हणणं दिल्लीत सांगितलं पाहिजे” अस देखील ते यावेळी म्हणाले आहेत.