श्रावणात पावसाची झड सुरू झाली की, रिकामपणात हाताला कांम म्हणून प्रत्येक शेतकरी हाती घे-या (फोटोत दर्शविलेला) फिरवत हिंडत फिरत दिसायचा गांवभर..पोळ्यासाठी बैलांना याच सुतापासून ऐसन,सर,म्होरकी,गोंडे हौसेने तयार केले जात . स्वत:च्या हाताने तयार केलेला साज पोळ्याच्या दिवशी बैलांना घातला जायचा . पोळ्याला बैल,दिवाळीत गाईम्हशी,दस-याला घोडा,चंपाषष्ठीला कुत्रा पूजनाची प्राचिन परंपरा कृषीजीवनाचे अविभाज्य अंग. ऋण निर्देश ही त्यापाठची भावना आज मात्र धूसर होतांना दिसतेय.
बैलांच्या शिंगांना देण्यासाठीच्या वारनिस(पेंट)चा डब्बा तेवढा विकत आणला जाई बाजारातून. आज परिस्थिती सगळीच बदललीय.खळखळणारा खिसा ,रेडीमेडच्या शाॅर्टकट जमान्यात आता घे-या अडगळीला पडत आहे. साज तयार करण्याचा सोसही कुणाला राहीलेला नाही. त्यामुळे सण ‘आला कधी अन् गेला कधी’ असे होवून जातय हल्ली….
घरा-दाराला आंब्याच्या पानांची तोरणं,चूना- कावं(गेरू)ने गोठा व घरांची रंगरंगोटी,भिंतीवर काढली जाणारी पोळ्याची वारली पेंटींग सारखी पारंपारिक चित्र,विचित्र रेखाटणं नजरेआड झालेत. वाख(पळसाच्या मुळ्या पासून तयार केलेले) गोंडे, वाखापासून तयार केलेल्या चाबूकासारख्या कोरडयांचे आवाज कानावर पडत नाहीत आताशा. एकूणच काय? तर, हरितक्रांतीच्या जमान्यात पशुधनाची गरज संपलीय.
नव्या तंत्रज्ञानामुळे गोवंश संपत चाललाय. अख्ख्या गावात पाचपंचेविस बैलजोड्या मिळणे मुश्कील झाले आहे.
धान्यं,धनम्,पशूबहूंपुत्र लाभं शतसंवत्सरे दीर्घायु: हे आशिर्वचनही निरर्थक ठरू पाहत आहे आजच्या जमान्यात. बैलांची ‘दावणं’ कास्तक-याच्या समृध्दीचे द्योतक मानले जायचे. कुणाच्या दावणीला किती बैलजोड्या? यावरून त्यांची ऐपत ठरे. आज ती ट्रॅक्टर,बाईकवर ठरते आहे. किराणा दुकानावर पाहिजे तो ‘ब्रॅंड’ मिळेल पण गावात ताक- दही कपभर दुध मिळणे कठीण.
वर्षभर शेतात काबाडकष्ट करणा-या बैलांच्या ऋणनिर्देशाचा दिवस म्हणजे पोळा तो मोठ्या उत्साहाने साजरा व्हायचा.मालक लोकांच्या घरी सालगड्यांना जेवणं असायचं. खांदेमळणच्या आदल्या दिवसापासून बैलोबांचे लाड सुरू होतं.. बैलांना आवतन देणे, नदीवर नेवून धुणे, पोहणी घालणे, तेल पाजणे , विळ्याच्या साह्याने त्यांचे शिंग साळून त्याची रंगरंगोटी करणे ही कामे शेतक-यांची मुलं करायची.
आता शिकून सवरून हुश्शार झालेली ही मुलं शहरात स्थिरावले.ही बाब निश्चितच समाधानाची असली तरी आता त्यांना मारोती मंदिरासमोर लागणारे लग्न पहायला जाण्याची,बैलांच्या पायावर काकडी फोडण्याची पुर्वापार ओढ राहिलेली नाही .बाजारात घासाघीस करून पाचपंचेविस रूपयाची बैलजोडी सोबत पस्तूरी(बोनस)म्हणून गायवासरू मिळालं तर खुषीने घरी आणतो अन् पुजतो. मोबाईलवरून आप्तेष्टांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या की संपलं. स्वनिर्मितीचा आनंद म्हणून देखील त्यांच्या मुलांचे हात चिखला-मातीत माखले जाण्याची शक्यताही असते दुरापास्त….
समृद्धी घरात प्रवेश करतांना सोबतीला ‘लिथार्जी’ घेवून येते की काय? असा प्रश्न पडतो काहीवेळा. ३०-३५ वर्षाखालील परिस्थिती सांगायची तर खरीप पेरणं आटोपल्यानंतर खोरिस(आर्थिक अडचणीत)आलेल्या शेतक-यांना हा सण उधारी उसनवारीवरचं साजरा होत असे. त्याकाळी शेतक-यांची सगळी दारोमदार मुग-उडीदावरचं असायची. त्यातही पाऊस लागून राहिला की,शेंगा तोडणी कठीण होवून बसायची. सरक्या (ओले कच्चे पांढरट मूग) बेभाव विकून पोळ्यांचा बाजार केला जायचा.पोळा महालक्ष्मीचा सण या मुगाउडीदाने साजरा केला तरी आनंद वाटायचा. त्याकाळी फाटकेतुटके पांघरणा-या लोकांची जीवननिष्ठा आठवता डोळ्यात पाणी उभं राहतं. भविष्यात शहरांप्रमाणेच खेड्यातही चिखलाच्या बैलाची पूजा पाहण्याचे दुर्भाग्य आपल्या तरी नशिबी येवू नये म्हणजे झालं…..
मल्हारिकांत देशमुख कोठेकर
परभणी
९८३४११९७१२