मुंबई : मुख्यमंत्र्यांनी काल ठाण्यातील टेंभी नाका याठिकाणी दहीहंडी उत्सवात उपस्थिती लावली होती. यावेळी त्या ठिकाणी भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “आम्ही दीड महिन्यापूर्वी ५० थरांची हंडी फोडली होती”. मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय नेत्यांनी हल्लाबोल केला. आता यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीदेखील मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाही, असा टोला खडसेंनी लगावला आहे.
माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “एकनाथ शिंदे कधी काय बोलतील? याचा काही नेम नाही. त्यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ मला कळत नाही. ५० आमदारांना घेऊन दहीहंडी फोडली, म्हणजे नेमकं काय केलं? शिवसेनेतून ५० आमदार फोडले आणि त्यांच्या मदतीने सरकार स्थापन केलं की भाजपासोबत गेले म्हणून सरकार स्थापन झालं. हे सगळं अर्थ न कळण्यासारखं आहे. त्यामुळे ते नेमके काय म्हणाले याचा अर्थ मला निश्चित समजला नाही.”
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दहीहंडी पथकातील गोविंदाना ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केलीय. याला देखील एकनाथ खडसे यांनी विरोध केला आहे. भावनेच्या भरात अशा प्रकारचा निर्णय घेणं योग्य नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. गोविंदा पथकाला ५ टक्के आरक्षण कोणत्या आधारावर देणार आहात? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलाय