मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. बरेच दिवस रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवन या ठिकाणी पार पडला आहे. शिंदे गटातून नऊ जण आणि भाजपातू नऊ जण असे एकूण १८ मंत्र्यांनी या मंत्रिमंडळ विस्तारात शपथ घेतली. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेताच त्यांनी टीईटी घोटाळा प्रकरणामध्ये माझ्या मुलींची नावे घेऊन माझी बदनामी करणाऱ्यांना समोर आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही. अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासाला मी कोठेही तडा जाऊ देणार नाही. जी जबाबदारी देतील ती पार पाडेन. मला दिलेल्या जबाबदारीचा फायदा सामान्य माणूस, गोरगरीब, शेतमजूर यांच्यापर्यंत कसा पोहोचेल याची मी दाखल घेईल. आतापर्यंत जे काम केले त्यापेक्षा दुप्पट काम करेन”.
दरम्यान, भाजपमधून गिरीश महाजन ,चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे , राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा या मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे तर शिंदे गटातील तानाजी सावंत , उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार , दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड , गुलाबराव पाटील या नेत्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. दरम्यान, राहिलेला मंत्रिमंडळाचा विस्तार देखील हळूहळू करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.