मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मागच्या बऱ्याच दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेमध्ये आहे. यानंतर आता आदित्य ठाकरे हे देखील तुरुंगात जातील, असं सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाईल, त्यामुळे तुम्ही पोराची काळजी घ्या, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे. किरीट सोमय्यांच्या (Kirit Somayya) या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
भाजप नेते पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील कसबा गणपतीचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला. यावेळी प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले की, “मागच्या वेळी गणपतीचं दर्शन घेताना मी तुरुंगात जात होतो, आज संपूर्ण महाराष्ट्र तुरुंगातून बाहेर आलाय, म्हणून गणपतीला धन्यवाद दिला. महाराष्ट्राला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ती दे, अशीही प्रार्थना केली.”
यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोम्य्या यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. किरीट सोम्य्या म्हणाले, “ज्यादिवशी महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं, त्यादिवशी महाराष्ट्रावरील अमंगल संपलं. आता स्वयं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात मंगलमय दिवस आणतायेत. उद्धव ठाकरे यांच्या माफीया सरकारला महाराष्ट्रातील जनतेनं कायमचं रवाना केलंय.”