Ulhas Patil । काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित केल आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. डॉ.उल्हास पाटील यांच्या पत्नी डॉक्टर वर्षा पाटील या दोघांसह काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचे काँग्रेसने निलंबन केले. उल्हास पाटील यांचे निलंबन झाल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी निलंबित केल्यानंतर उल्हास पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “काँग्रेसमध्ये एकाधिकारशाही दिसत आहे यामुळेच काँग्रेस रसातळाला जात आहे. कोणत्याही प्रकारची विचारणा किंवा नोटीस न देता माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. असं म्हणत उल्हास पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
त्याचबरोबर पुढे बोलताना उल्हास पाटील म्हणाले, “मला दुपारी दोन वाजता निलंबित केल्याचे पत्र मिळाले. मात्र कोणताही विचार न करता थेट कारवाई केल्यामुळे आता त्यांना विचारायचं काय? असा प्रश्न उल्हास पाटील यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला यावर उत्तर देत उल्हास पाटील म्हणाले, कारवाई झाल्यामुळे आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल असं म्हणत त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाचे संकेत दिले आहेत”.