Vasant More । लोकसभा निवडणुकीआधीच राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मोठा धक्का बसला आहे. वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे. अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा.. असं म्हणत मनसेला रामराम करत वसंत मोरे यांनी ट्विट केले आहे. यांनतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना ते चांगलेच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
माध्यमांशी संवाद साधताना वसंत मोरे म्हणाले, “गेली २५ वर्ष मी राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) काम केलं असून आज मी अखेर मनसेच्या सर्व पदांचा राजनामा दिला आहे. मला पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवायची होती मात्र मी लोकसभा निवडणूक लढवायची म्हण्टल्यानंतर मनसेमधील पुण्यातील यादी वाढत गेली. पुण्यामध्ये मनसेची परिस्थिती नाजूक आहे. मनसे लोकसभा लढू शकत नाही, मग माझा कडेलोट झाला…” असे वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा वाद राज ठाकरे आणि मनसे यांच्याशी नसून चुकीच्या लोकांच्या हाती शहर दिले. मी मनसेकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, आता बाकी इच्छुक असणाऱ्यांना उमेदवारी द्यावी…” असे वसंत मोरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर येत्या दोन दिवसात मी कोणत्या पक्षात जाईल याबाबत देखील भूमिका सपष्ट करणार असल्याचे मनसे नेते वसंत मोरे म्हणाले आहेत.