मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंडखोरी करत भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तसेच उपमुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना मिळाले. यानंतर शिवसेनेला मोठ्या प्रमाणात गळती लागली. अनेक खासदार देखील शिंदे गटात सामील झाले.
बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला ही गोष्ट शिवसैनिकांच्या मनाला लागली आहे. यामुळेच नेहमी उद्धव ठाकरेंसोबतच आपण आहे हे दाखवून देण्यासाठी एक कट्टर शिवसैनिक 424 किमी अंतर सायकलवर पार करून उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे समोर आले आहे.
या शिवसैनिकाचे नाव नितीन सुकाळे असे आहे. उस्मानाबादमधील राशी या ठिकाणचे ते रहिवासी आहेत. त्यांनी 1 ऑगस्टला संध्याकाळी सात वाजता वाशी ते मुंबई या प्रवासाला सायकलवरून सुरुवात केली आहे. 3 ऑगस्टला ते पुण्यात पोहचले होते. यावेळी पुण्यात शिवसेना शहर उपप्रमुख बाळासाहेब मालुसरे, हनुमंत दगडे, भास्कर बलकवडे, गणी पठाण, धनंजय क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले आहे.
सुकाळे यांना पुण्यापर्यंतच्या प्रवासात 4 मुक्काम करावे लागले आहेत. यावेळी त्यांनी कधी मंदिर,कधी सार्वजनिक बाक, तर कधी मिळेल त्या ठिकाणी मुक्काम करत पुणे गाठले आहे. सुकाळे यांची परिस्थिती सर्वसामान्य असून ते सेंट्रिग मिस्त्रीचे काम करतात. या प्रवासात अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत झाले आहे.
दरम्यान, पुण्यात स्वागतावेळी अनेकांनी त्यांच्याशी संवाद साधला आहे यावेळी सुकाळे म्हणाले आहेत की, ‘शिवसेनेसोबत केलेल्या बंडानंतर तळागाळातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात दुखावला गेला आहे. अशावेळी आम्ही सामान्य शिवसैनिक तुमच्यासोबत आहोत हे सांगण्यासाठी मी वाशी ते मुंबई असा प्रवास करत आहे.’