मुंबई : पावसाळ्यामध्ये आपल्याला अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते जसे की, नद्यांना पूर येणे, वीज कोसळणे, ढगफुटी होणे अशा गोष्टी होत असतात. पाऊस कसा पडतो व ढगफुटी म्हणजे नेमकं काय? ढगफुटी का होते याची सविस्तर पाहणार आहोत.
समुद्राच्या पाण्याचे सूर्याच्या उष्णतेमुळे वाफेत रूपांतर होते ही वाफ हवेपेक्षा हलकी असल्याने वातावरणात उंच जाते. तीच वाफ जास्त प्रमाणात जमा झाल्याने त्याचे ढग तयार होतात. असे ढग वाऱ्याबरोबर जमिनीच्या दिशेने येत असतात. तसेच ढगांना थंड हवेचा स्पर्श झाल्याने त्याचे पाण्याच्या थेंबामध्ये रूपांतर होते. हेच पाणी हवेपेक्षा जड असल्याने ते जमिनीवरती कोसळते यालाच आपण पाऊस म्हणतो.
हाच पाऊस किंवा ढगांमधून पडणारे पाणी कमी वेळामध्ये जास्त प्रमाणात पडले तर त्याला अतिवृष्टी किंवा ढगफुटी म्हणतात. पडणारा पाऊस हा पर्जन्यमापक यंत्राच्या साह्याने मोजला जातो. त्यावरून किती वेळा मध्ये किती पाऊस झाला याचा अंदाज घेता येतो. जर 24 तासाच्या आतमध्ये 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असे संबोधले जाते किंवा अतिवृष्टी म्हणतात. आणि 24 तासांपेक्षा खूप कमी कालावधीत जर शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर अशा परिस्थितीमध्ये ढगफुटी झाली असे म्हणतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ढग का फुटतात? चला तर मग जाणून घेऊया याविषयी
डोंगराळ भागांमध्ये ढगांच्या प्रवाहामध्ये उंच डोंगरां मुळे अडथळ निर्माण होतो. यामुळे ढगांची घनता वाढत असते म्हणजेच ढग जास्तीत जास्त एकत्र येत असतात याच वेळेस हवेचा दाब कमी होऊन थंड वाऱ्यामुळे ढगांचे पाण्यामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते. हे पाणी जमिनीच्या दिशेने कोसळते त्यामुळे डोंगराळ भागात ढगफुटी होण्याची जास्त शक्यता असते. ढगफुटी ही फक्त डोंगराळ प्रदेशातच होत नाही ती सपाट प्रदेशांमध्ये होऊ शकते. काही नैसर्गिक कारणांमुळे ढगांची घनता वाढल्यामुळे, हवेचा दाब कमी होणे, थंड वारे, अशी सर्व प्रक्रिया एकाच वेळेस घडते त्यामुळे ढगफुटी होत असते.
पाऊस किंवा अतिवृष्टी यांचा अंदाज लावला जाऊ शकतो पण ढगफुटीचा अंदाज लावता येत नाही. याशिवाय ढगफुटी चे प्रमाण हे जास्तीत जास्त पर्वतीय डोंगराळ भागांमध्ये असते. भारतात पाहिलं तर हिमालयाच्या प्रदेशांमध्ये जास्त प्रमाणात ढगफुटी होते.