मुंबई : शिंदे-फडणीस सरकार स्थापन होऊन दीड महिन्यानंतर अखेर मंत्रीमंडळ विस्तार झाला. पण अजूनदेखील खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून शिंदे-फडणीस सरकारवर जोरदार टीका होत आहे. खातेवाटप झाली नसल्याने राज्यातील अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचाही आरोप देखील केला जातोय. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खातेवाटप कधी होणार असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उपमुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खातेवाटप लवकरात लवकर होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खातेवाटप करत आहात. आम्ही पेपर फोडला, तर तुम्हाला काम मिळणार नाही.”
यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी मुंबई मेट्रो कारशेडवरून होणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. पण त्याचा वाद असल्याने ते प्रकरण हायकोर्टात सुरू आहे. मेट्रो कारशेडची जागा मेट्रो ३ करिता मागितलेली आहे.कांजूर मार्गची जागा मेट्रो ६ साठी मागितली आहे.”