संत बाळूमामा बद्दल तुम्ही बरच काही ऐकलं असेल. पण संत बाळूमामा कोण होते? त्यांच गाव कोणतं?, ते कोणतं कार्य करायचे? या गोष्टी अजूनही बऱ्याच लोकांना माहिती नाहीत. तर आज आपण या लेखामध्ये संत बाळूमामा बद्दल सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत.
बाळूमामांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी झाला. बाळूमामांचे मुळ नाव बालप्पा असुन त्यावेळची मुंबई राज्यात व सध्या कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यात अक्कोळ हे गांव आहे. यांच्या वडिलांचे नाव श्री मायाप्पा आरभावे व आईचे नाव सत्यव्वा आहे. मायाप्पा आणि सत्यव्वा या धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांनी जन्म घेतला.
बाळूमामा लहानपणी जैन समाजातील व्यापारी चंदुलाल यांच्याकडे कामाला होते. बाळूमामा त्यांच्या बहिणीकडे राहत होते. बहिणीची मुले त्यांना मामा म्हणत असल्याने त्यांना सर्वजण मामाच म्हणू लागले. ओघाओघाने ते पुन्हा सर्वत्र मामा याच नावाने परिचित झाले.
बाळू मामांच्या पोषाखाबद्दल पहिले तर शर्ट, धोतर, फेटा, कोल्हापुरी चप्पल, कांबळा असा बाळू मामांचा पोशाख होता. बाळू मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये गावोगावी फिरत असत. बाळू मामांनी अनेक चमत्कार घडविले असून त्यांना प्रसिद्धीची कधीही हाव नव्हती. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी भाषेत ते सर्वांना न्याय देत धर्म चरणाचा उपदेश करत. कधी कधी बाळूमामा शिव्या देखील देत पण लोक त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वाद म्हणून घेत असत.
मामा बकऱ्यांसोबत कायम या शिवारातून त्या शिवारात फिरायचे. बाळू मामांनी गोरगरिबांचा विचार करून 1932 सालापासून भंडारा उत्सव चालू केला. यामध्ये गोरगरीब लोक पोटभरून जेवण करायचे.
आदमापुरमध्ये ‘सद्गुरू संत ‘बाळूमामा यांच्या समाधीचे मंदिर आहे. याचे दर्शन घेण्यासाठी लोक लांबूनलांबून येतात. आदमापूरमध्ये बाळूमामाच्या मूर्ती शेजारी उजव्या हाताला सद्गुरू परमहंस मुळे महाराज, यांची देखील मूर्ती आहे. तर डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. बाळूमामांच्या मंदिरातील एक खास गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणालाही देणगी मागितली जात नाही. इच्छेनुसार भक्त लोक या ठिकाणी देणगी देत असतात.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे बाळुमामाच्या सानिध्यात अनेक माणसं सुधारली आहेत. अनेक लोक बाळुमामाच्या बकऱ्या चारण्यासाठी त्यांच्या कळपामध्ये येऊन राहतात. बाळुमामाच्या बकऱ्यांचे अनेक कळप असून सगळीकडे फिरत असतात. यावेळी लोक बाळू मामांची सेवा म्हणून बकऱ्यांची सेवा करतात.