मुंबई : ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम झी मराठीवर चालू आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर सध्या खूप चर्चा आहे. या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवलेल्या महिला सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागामध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी देखील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली.
या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अनेक खुलासे केले. अमृता फडणवीस यांना ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे गाणं ऐकल्यावर कोणाचा चेहरा समोर येतो? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या उत्तर देत म्हणाल्या की, “उद्धवजी ठाकरे यांचा खूप मान आणि सन्मान. पण हे गाणं ऐकल्याबरोबर मला त्यांचाच चेहरा आठवला.”
अमृता फडणवीसांचे उत्तर ऐकून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून काही लोकांनी त्यांना ट्रोल देखील केले आहे.