मुंबई : दरवर्षी अनंत चतर्दशीला गणपती बाप्पा आपल्याकडे वास्तव्याला येतात. संपूर्ण भारतात बहुतेक करून अकरा दिवसाचा गणपती बसविल्या जातो. अकरा दिवस गणपती उत्सव मोठया आनंदात पार पडतो. आपल्याकडे गणपती वास्तव्याला असताना त्याला दररोज वेगवेगळे भोग लावले जातात. मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतली जातात. शेवटच्या दिवशी गणपतीला निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, असे म्हटले जाते. आणि तितक्याच आतुरतेने बाप्पाची वाट पाहिली जाते.
अकरा दिवसाचा सोहळा विलक्षण असतो. मात्र अनेक लोक आपल्या घरघुती गणपतींचं विसर्जन हे दीड दिवसांनीच करतात. घरी गणपतीचं करणारं कोणीच नसतं त्याकरिता अनेकांना वेळ मिळत नाही, मुलं कामाला जाणारी असतात तेव्हा बाप्पांची दहा दिवस काही सेवा करता येत नाही. अशी काही कारणं ढोबळमानाने सांगितली जातात. परंतु दिड दिवसाच्या गणपतीचं रहस्य काही वेगळंच आहे.
दिड दिवसाच्या गणपती ची परंपरा कशी पडली?
या गणपतीच्या दीड दिवसा मागचं रहस्य आपल्याला भारतीय शेती संस्कृतीत सापडतं. प्रसिद्ध अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी यामागची एक गोष्ट सांगितली आहे. “भारत हा कृषीप्रधान देश आहे. तेव्हा भाद्रपद महिन्यात साधारणं चतुर्थीच्यादरम्यान धान्याच्या लोंब्या हिरव्यागार पात्यातून डोलू लागतात. चतुर्थीला धरणीमातेचे आभार मानले जातात. धरणी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पूर्वी बांधावरच मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जायची.” असे त्यांचे म्हणणे आहे.
पूजा केल्यानंतर त्याचदिवशी या मूर्तीचं नदीत विसर्जन केलं जायचं. नंतर जस जसा काळ बदलतं गेला तसा या परंपरेत बदल होऊ लागला. अनेकजण मातीची मूर्ती तयार करून ती घरी आणू लागले. तिची प्राणप्रतिष्ठापना करून नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि हळूहळू दीड दिवसाच्या गणपती पूजनाचा परंपरा रूढ होत गेली.