शेती करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. नैसर्गिक संकटे, रोगराई, वीजटंचाई यांसारख्या समस्या शेतकऱ्यांना वेळोवेळी हतबल करत असतात. यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होते. परंतु, माघार घेतील ते शेतकरी कसले ! शेतातील किडीने त्रस्त झालेल्या अशाच एका शेतकऱ्याने माघार न घेता एक भन्नाट उपाय शोधला आहे.
ब्लॅक थ्रीप (Black Thrip) या किडीमुळे मिरची या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही कीड सहजासहजी मरत नाही. रासायनिक व सेंद्रिय औषधांचा देखील या किडीवर काही फरक पडत नाही. या किडीमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मिरची या पिकाचे नुकसान झाले आहे. यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याने (Young Farmer) अनोखा स्वस्तात मस्त फंडा शोधला आहे. सतीश गिरसावळे हे या तरुणाचे नाव असून तो पंचाळा येथे राहणार आहे.
सतीश गिरसावळे याने या किडीचा नायनाट करण्यासाठी सौरऊर्जेवर (Solar energy) चालणारं यंत्र तयार केलं आहे. ब्लॅक थ्रीप हा निळ्या रंगाकडे आकृष्ट होतो हे लक्षात आल्यानंतर सतीश यांनी कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून यावरती काही ट्रायल केल्या. निळ्या रंगाचे मेकॅनिझम वापरून सतीश यांनी हे यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे कीड निळ्या रंगाकडे आकर्षित होऊन पाण्यात पडते.