
मुंबई : टीईटी परीक्षेमध्ये घोटाळा झाला असून या प्रकरणात अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे देखील नाव घेण्यात येत आहे. यावरूनच अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषद घेऊन यामध्ये याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. माझी बदनामी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे अब्दुल सत्तार पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.
याचसोबत “मला व्हॉट्सअपवर अशा प्रकारचा मेसेज दिसल्यानंतर मी स्वत: त्याचं स्पष्टीकरण दिलं. कुणीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे माझी बदनामी करत आहे. त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार” अस देखील ते म्हणाले आहेत.
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की, “कायद्यानुसार या प्रकरणात जर कोणतीही चूक असेल, तर मुख्यमंत्री चौकशीचे आदेश देतील. सचिव किंवा शैक्षणिक अधिकारी यांच्याशिवाय याबद्दल दुसरं कोण स्पष्टीकरण देणार?” असा सवाल उपस्थित करून पुढे ते म्हणाले आहेत की, “माझ्या परिवाराची चूक असेल, या प्रकरणी मी काही फायदा घेतला असेल तर मी गुन्हेगार आहे. नाहीतर ज्यांनी यात माझ्या कुटुंबाचं नाव घेतलं, त्यांची चौकशी मी करायला सांगणार”.
दरम्यान, “माझ्या कुटुंबाच्या लोकांनी पात्र असल्याचा काही फायदा घेतला असेल, तर त्यांच्यावर जरूर कारवाई झाली पाहिजे. माझा मुलगा टीईटी परीक्षेला बसलाच नाही. मग त्याचं नाव यादीत कसं येईल? तरी काही लोक त्यात नाव घेत असतील, तर चौकशीत येऊ द्या सगळं समोर”, अस वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केलेले आहे.