
मागच्या काही दिवसापासून गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या ‘पाटील’ या आडनावावरून चर्चेत आहे. गौतमीने हिने पाटील आडनाव लावू नये, असा इशारा काही संघटनांनी दिला होता. त्यांनतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. अनेक राजकीय नेत्यांनी देखील यावर मत मांडले होते. काहींनी गौतमीला विरोध दर्शविला होता तर काहींनी गौतमीला साथ दिली होती.
गौतमी जेव्हापासून चर्चेत आली तेव्हापासून तिने तिच्यावडिलांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या होत्या. मात्र तिचे वडील आत्तापर्यंत कुठेही दिसले नव्हते. दरम्यान आता गौतमी पाटीलचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील यांनी या संपूर्ण विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ते पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले आहेत.
माध्यमांशी बोलताना गौतमीच्या वडिलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पाटील आडनाव लावू नकोस म्हणणाऱ्यांना काय सांगाल, असं विचारताच गौतमीचे वडील म्हणाले, “तिला पाटील आडनाव लावू नको असं कोणी म्हणू शकत नाही कारण पाटील ते पाटीलच राहणार. ती पाटील घराण्यातली आहे. ती जात बदलू शकेल का? तुमचं कुळ असेल तेच राहणार, ते कसं बदलेल. असं रविंद्र नेरपगारे पाटील म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.